28 November 2010

गीतारहस्य - ले. बाळ गंगाधर टिळक



भगवद्‌गीतेवर असंख्य टीकाग्रंथ उपलब्ध असताना आणखी एक ग्रंथ लोकमान्य टिळकांना कां लिहावासा वाटला. पाहू या त्यांच्याच शब्दांत -

"सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवून ब्रह्मज्ञान, भक्ति वैगैरे नुसत्या निवृत्तिपर मोक्षमार्गाचेच गीतेत निरूपण केले आहे, हे मत जरी आम्हांस मान्य नाही, तरी मोक्षप्राप्तीच्या मार्गाचे भगवद्‌गीतेत मुदलीच विवेचन नाही, असेही आमचे म्हणणे नाही. किंबहुना प्रत्येक मनुष्याने शुद्ध परमेश्वरस्वरूपाने ज्ञान संपादन करून तद्‌द्वारा आपली बुद्धि होईल तितकी निर्मल व प्रवित्र करणे, हे गीताशास्त्राप्रमाणे त्याचे जगांतील पहिले कर्तव्य असे आम्हींही या ग्रंथात स्पष्ट दाखविले आहे. परंतु हा गीतेंतील मुख्य मुद्दा नव्हे. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षी कुलक्षयादि घोर पातके घडून जे युद्ध मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार तें का करूं नये, अशा कर्तव्य मोहांत युद्धारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठी शुद्ध वेदांत शास्त्राधारें कर्माकर्माचे व त्याबरोबरच मोक्षोपायाचेंही पूर्ण् विवेचन करून, आणि कर्में कधीच सुटत नाहींत व सोडूं नयेत असें ठरवून, ज्या युक्तीने कर्में केली म्हणजे कोणतेच पाप न लागतां अखेर त्यानेंच मोक्षही मिळतो, त्या युक्तीचे म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचेंच गीतेंत प्रतिपादन आहे, असा आमचा अभिप्राय आहे. कर्माकर्माच्या किंवा धर्माधर्माच्या या विवेचनासच आधुनिक केवळ आधिभौतिक पंडित नीतिशास्त्र असे म्हणतात. हे विवेचन गीतेंत कोणत्या प्रकारें केले आहे हे सामान्य पद्धतीप्रमाणें गीतेवर श्लोकानुक्रमानें टीका करून दाखवितां आलें नसते असे नाही. पण वेदांत, मीमांसा, सांख्य, कर्मविपाक किंवा भक्ति, वगैरे शास्त्रांतील ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारें कर्मयोगाचें गीतेंत प्रतिपादन केलेले आहे, व ज्याचा उल्लेख कधी कधी फारच संक्षिप्तरीत्या केलेला असतो, त्या शास्त्रीय सिद्धांताची आगाऊ माहिती असल्याखेरीज गीतेंतील विवेचनाचे पूर्ण मर्म सहसा लक्षांत भरत नाही. यासाठीं गीतेंत जे जे विषय किंवा सिद्धांत आले आहेत त्यांचे शास्त्रीयरीत्या प्रकरणशः विभाग पाडून, त्यातील प्रमुख प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यांत त्याचे प्रथम थोडक्यांत निरूपण केले आहे; व त्यांतच प्रस्तुत कालच्या चौकस पद्धतीप्रमाणे गीतेच्या प्रमुख सिद्धांताची इतर धर्मांतील व तत्त्वज्ञानांतील सिद्धांतांशी प्रसंगानुसार संक्षेपाने तुलना करून दाखविली आहे. या पुस्तकांत प्रथम दिलेला गीतारहस्य हा निबंध अशा रीतीनें कर्मयोगावर एक लहानसा पण स्वतंत्र ग्रंथ आहे."

DOWNLOAD [Right click to save]

भाग १ ला
भाग २ रा
भाग ३ रा
भाग ४ था
गीतार्थ - अध्याय १ ते ७

गीतार्थ - अध्याय ८ ते १८
---------------------

24 November 2010

साधक संजीवनी - परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास कृत भगवद्‌गीतेवरील विस्तृत टीका -

साधक संजीवनी -
परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास कृत भगवद्‌गीतेवरील विस्तृत टीका -


श्रीमद् भगवद्‌गीता एक विलक्षण ग्रंथ आहे. त्याचे वैलक्षण म्हणजे परब्रह्म परमात्म्याने अवतार घेऊन स्वमुखाने मानवास मोक्षस्थिती अनुभविण्याचा उपदेश केला आहे. मोक्षप्राप्तीचे मुख्यतः तीन राजमार्ग म्हटले आहेत त्यास प्रस्थानत्रयी म्हणतात. गीता, उपनिषद् आणि ब्रह्मसूत्र हे तीन प्रस्थान. असे म्हणतात की उपनिषदांचे श्रवण करावे, ब्रह्मसूत्रांचे मनन करावे आणि भगवद्‌गीतेचे निदिध्यासन करीत ब्रह्माचा अनुभव घ्यावा.

भगवद्‌गीतेवर अनेकानेक भाष्ये आहेत. "साधक संजीवनी" ही भगवद्‌गीतेवरील परमश्रद्धेय स्वामी रामसुखदास यांची टीका. स्वामी म्हणतात - भगवद्‌गीता असा विलक्षण ग्रंथ आहे की ज्याचा कोणाला पार लागू शकला नाही, पार लागू शकत नाही आणि पार लागू शकतच नाही. याचे नित्य अध्ययन मनन केल्यास नित्य नवीन भाव प्रकट होत राहतात. गीतेत जितका भाव भरला आहे, तितका बुद्धीत येत नाही. जितका बुद्धीत येतो, तितका मनात येत नाही, जितका मनात येतो तितका सांगण्यात येत नाही. गीता असीम आहे परंतु तिची टीका सीमितच असते. स्वामी पुढे म्हणतात मला आधी निर्गुणाचे प्राधान्य वाटायचे, पण त्यात सर्वच बाबींचे योग्य समाधान होत नाही. परंतु सगुण प्रधान मानल्याने कोणताही संशय शिल्लक राहात नाही. समग्र सगुणातच आहे, निर्गुणात नाही. पाहूया तर असा अनुभव घेतलेले श्रेष्ठ संत स्वामी रामसुखदास आपल्या टीकेत काय म्हणतात.

स्वामींचा आग्रह आहे साधकांनी स्वतःचा कोणताही आग्रह न ठेवता ही टीका वाचावी आणि यावर सखोल विचार करावा म्हणजे वास्तविक तत्त्व त्यांना समजून येईल आणि जी गोष्ट टीकेत आली नसेल, तीही समजून येईल.

DOWNLOAD [Right click to save]

अध्याय १ ला
अध्याय २ रा
अध्याय ३ रा
अध्याय ४ था
अध्याय ५ वा
अध्याय ६ वा
अध्याय ७ वा
अध्याय ८ वा
अध्याय ९ वा
अध्याय १० वा
अध्याय ११ वा
अध्याय १२ वा
अध्याय १३ वा
अध्याय १४ वा
अध्याय १५ वा
अध्याय १६ वा
अध्याय १७ वा
अध्याय १८ वा
***