"सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवून ब्रह्मज्ञान, भक्ति वैगैरे नुसत्या निवृत्तिपर मोक्षमार्गाचेच गीतेत निरूपण केले आहे, हे मत जरी आम्हांस मान्य नाही, तरी मोक्षप्राप्तीच्या मार्गाचे भगवद्गीतेत मुदलीच विवेचन नाही, असेही आमचे म्हणणे नाही. किंबहुना प्रत्येक मनुष्याने शुद्ध परमेश्वरस्वरूपाने ज्ञान संपादन करून तद्द्वारा आपली बुद्धि होईल तितकी निर्मल व प्रवित्र करणे, हे गीताशास्त्राप्रमाणे त्याचे जगांतील पहिले कर्तव्य असे आम्हींही या ग्रंथात स्पष्ट दाखविले आहे. परंतु हा गीतेंतील मुख्य मुद्दा नव्हे. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षी कुलक्षयादि घोर पातके घडून जे युद्ध मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार तें का करूं नये, अशा कर्तव्य मोहांत युद्धारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठी शुद्ध वेदांत शास्त्राधारें कर्माकर्माचे व त्याबरोबरच मोक्षोपायाचेंही पूर्ण् विवेचन करून, आणि कर्में कधीच सुटत नाहींत व सोडूं नयेत असें ठरवून, ज्या युक्तीने कर्में केली म्हणजे कोणतेच पाप न लागतां अखेर त्यानेंच मोक्षही मिळतो, त्या युक्तीचे म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचेंच गीतेंत प्रतिपादन आहे, असा आमचा अभिप्राय आहे. कर्माकर्माच्या किंवा धर्माधर्माच्या या विवेचनासच आधुनिक केवळ आधिभौतिक पंडित नीतिशास्त्र असे म्हणतात. हे विवेचन गीतेंत कोणत्या प्रकारें केले आहे हे सामान्य पद्धतीप्रमाणें गीतेवर श्लोकानुक्रमानें टीका करून दाखवितां आलें नसते असे नाही. पण वेदांत, मीमांसा, सांख्य, कर्मविपाक किंवा भक्ति, वगैरे शास्त्रांतील ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारें कर्मयोगाचें गीतेंत प्रतिपादन केलेले आहे, व ज्याचा उल्लेख कधी कधी फारच संक्षिप्तरीत्या केलेला असतो, त्या शास्त्रीय सिद्धांताची आगाऊ माहिती असल्याखेरीज गीतेंतील विवेचनाचे पूर्ण मर्म सहसा लक्षांत भरत नाही. यासाठीं गीतेंत जे जे विषय किंवा सिद्धांत आले आहेत त्यांचे शास्त्रीयरीत्या प्रकरणशः विभाग पाडून, त्यातील प्रमुख प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यांत त्याचे प्रथम थोडक्यांत निरूपण केले आहे; व त्यांतच प्रस्तुत कालच्या चौकस पद्धतीप्रमाणे गीतेच्या प्रमुख सिद्धांताची इतर धर्मांतील व तत्त्वज्ञानांतील सिद्धांतांशी प्रसंगानुसार संक्षेपाने तुलना करून दाखविली आहे. या पुस्तकांत प्रथम दिलेला गीतारहस्य हा निबंध अशा रीतीनें कर्मयोगावर एक लहानसा पण स्वतंत्र ग्रंथ आहे."
DOWNLOAD [Right click to save]
भाग १ ला
भाग २ रा
भाग ३ रा
भाग ४ था
गीतार्थ - अध्याय १ ते ७
गीतार्थ - अध्याय ८ ते १८
---------------------